Ad will apear here
Next
इंदिराजींच्या कणखर भूमिकेमुळे १९७१च्या युद्धात भारताचा विजय
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांचे प्रतिपादन


रत्नागिरी :
‘अमेरिका, इंग्लंड अशा बलाढ्य देशांचा दबाव असूनही, कणखर राहून त्याकडे साफ दुर्लक्ष करून १९७१ साली झालेल्या युद्धात इंदिरा गांधी यांनी अभूतपूर्व मुत्सद्देगिरी केली. त्यांच्या कणखरतेमुळेच पाकिस्तानचे विभाजन करण्यात यश मिळाले. त्याआधीच्या सरकारांनी केलेल्या चुका त्यांनी केल्या नाहीत,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले.

रत्नागिरीतील पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाची सांगता १२ जानेवारी २०२० रोजी झाली. समारोपाचे कीर्तन करताना आफळेबुवांनी १९७१च्या युद्धातील इंदिराजींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आणि जवानांची शौर्यगाथा उलगडली. 

आफळेबुवा म्हणाले, ‘१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबरच पाकिस्तान अस्तित्वात आले. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे पाकिस्तानचे दोन भाग पडले, तरी देश एकच होता. पश्चिम पाकिस्तान पंजाबी मुसलमानांचा तर पूर्व पाकिस्तान बंगाली मुस्लिमांचा होता. त्या दोघांचे कधीही पटले नाही. युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. १९६५मध्ये झालेल्या युद्धात पराभव होऊनही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाली नव्हती. राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांना राष्ट्राध्यक्षपदाची स्वप्ने बाळगणारे झुल्फिकार अली भुत्तो भारताविरुद्ध चिथावत होते. काही तरी कुरापती काढून भारतावर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानलाही त्यांना नामोहरम करायचे होते. त्या दरम्यान पूर्व पाकिस्तानमधील मुजीबुर रेहमान या नेत्याला निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले. ते पश्चिम पाकिस्तानच्या जिव्हारी लागले. या स्थितीत मुजीबुर रेहमान यांच्या मागण्या मान्य करण्याचा कांगावा करून चर्चेचा देखावा करण्यात आला. तेव्हाचा पाकिस्तानचा लष्करप्रमुख टिक्का खान याने अनन्वित अत्याचार केले. पंजाबचे मुसलमान बंगालच्या मुसलमानांना मारत होते, अशी विदारक स्थिती होती. टिक्का खानने त्या काळात दररोज सात हजार माणसे मारली. यामुळे भयभीत झालेले सुमारे नऊ लाख निर्वासित दोन आठवड्यांत भारतात आश्रयाला आले. मुजीबुर रेहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला. कणखरपणासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदिराजींनी जुन्या सरकारांची कोणतीही चूक केली नाही.’
 
‘तेव्हाचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्याशी मसलत करून इंदिराजींनी पाकिस्तानवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. नौदल, वायुदल आणि लष्कराचा योग्य समन्वय साधून कराची बंदरात दारूगोळा आणि साधनसामग्री असलेली चार जहाजे नष्ट करण्यात भारतीय सैन्याला अभूतपूर्व यश मिळाले. कराची किनारा ताब्यात आल्यामुळे पाकिस्तानला मोठी दहशत बसली. त्याच वेळी पूर्व पाकिस्तानातील ढाक्यात भारतीय सेना गनिमी काव्याने मोठ्या प्रमाणावर पोहोचविण्यात आली. सुमारे आठ लाख भारतीय सैनिक त्या वेळी वेगवेगळ्या मोहिमांवर काम करत होते. पूर्व पाकिस्तानातील मुजीबुर रेहमान यांच्या मुक्तीवाहिनी संघटनेला पुरेसे पाठबळ दिले. त्यातून एक लाख पाकिस्तानी सैनिक शरणार्थी झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार पाकिस्तान आणि बांगलादेश अशी एका देशाची दोन देशांमध्ये विभागणी झाली. ज्या शेख मुजीबुर रेहमान यांना पाकिस्तानने कपटाने अटक करून १८ डिसेंबर १९७१ फाशी देणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांनाच बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून १६ डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदी बसविण्यात इंदिराजी यशस्वी झाल्या. इंदिराजींच्या या शौर्याचे जाहीर अभिनंदन तेव्हाचे जनसंघाचे खासदार आणि विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘साक्षात दुर्गामाता’ अशा शब्दांत भर संसदेत केले,’ असे आफळेबुवांनी सांगितले.

‘१९७१ नंतरही पाकिस्तानकडून सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यातूनच कारगिलसारखी प्रकरणे घडली आहेत. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान टपून बसला आहे. ज्या बांगलादेशला भारताने स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व निर्माण करून दिले, त्या बांगलादेशमधूनही मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू आहे. लक्षावधी बांगलादेशी भारतात घुसले आहेत. आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना हुसकावून लावण्यासाठी ‘एनआरसी’सारखे जे कायदे तयार करण्यात आले, त्याविरोधात विरोधकांनी आपले मतदार कमी होतील या एकाच भीतीने रान उठविले आहे. खोटा प्रचार चालविला आहे. घुसखोरांना प्रतिष्ठित करून त्यांना सत्ता मिळवायची आहे. प्रत्येक भारतीयाने याचा अभ्यास केला पाहिजे आणि देशाचे अस्तित्व, सुरक्षाव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रत्येकाने सजग राहायला हवे, प्रत्येकाने बळकट व्हायला हवे आणि अपप्रचाराला बळी पडता कामा नये,’ असे आवाहन बुवांनी शेवटी केले. 

इतिहासविषयक प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या सार्थक संजय पुराणिक, श्रद्धा विजय क्षीरसागर आणि चंद्रशेखर नीलेश जोशी या विद्यार्थ्यांना कीर्तनाच्या मध्यंतरात पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना कीर्तनसंध्या परिवारातर्फे शाल, श्रीफळ आणि २१ हजारांचा चेक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी सैनिक कल्याण निधीचे काम करणाऱ्या सौ. निंभोरकर यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. ‘लव्ह जिहाद’मुळे पीडित झालेल्या मुलींचे पुनर्वसन, तसेच नांदेड येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या २० मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणाऱ्या सौ. शुभांगी चारुदत्त आफळे यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

पुढच्या वर्षी म्हणजेच २०२१मध्ये कीर्तनसंध्या महोत्सव दोन जानेवारी ते सहा जानेवारी या काळात होणार असून, त्यामध्ये १९७१ पासून १९९९पर्यंतच्या भारतीय युद्धांचा इतिहास या विषयावर कीर्तने होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

आफळेबुवांना हेरंब जोगळेकर (तबला), वरद सोहोनी (ऑर्गन), प्रथमेश तारळकर (पखवाज), राजन किल्लेकर (सिंथेसायझर), उदय गोखले (व्हायोलिन), हरेश केळकर (तालवाद्य आणि शंख) आणि अभिजित भट (गायन) यांनी साथसंगत केली. संपूर्ण महोत्सवात निबंध कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले.

कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. समारोपाच्या दिवशी गर्दीत आणखी मोठी वाढ झाली होती. 

(२०२०मधील संपूर्ण कीर्तनसंध्या महोत्सवाचे सविस्तर वार्तांकन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZRDCI
Similar Posts
राष्ट्रउभारणीसाठी वक्तृत्व आणि कर्तृत्वातून नेतृत्व घडवायला हवे रत्नागिरी : ‘समाजातील चांगल्या गोष्टींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आणि त्या बाजूने बोलण्यासाठी धाडस आणि चांगल्या वक्तृत्वाची आवश्यकता असते. त्यातून कर्तृत्व घडत जाते आणि त्यातूनच टप्प्याटप्प्याने नेतृत्व घडते, जे राष्ट्रउभारणीसाठी अत्यंत आवश्यक असते. या कार्यामध्ये सध्या प्राध्यापकांचा सहभाग फारसा दिसत नाही
लालबहादूरशास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम रत्नागिरी : ‘देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूरशास्त्री म्हणजे राजकारणातील मर्यादापुरुषोत्तम होते. शेती आणि संरक्षण या देशाच्या अत्यावश्यक बाबींकडे त्यांनी आवर्जून लक्ष दिल्यामुळे या दोन्ही बाबतींमध्ये देश नेहमीच आघाडीवर राहिला,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्तबुवा आफळे यांनी रत्नागिरीत केले
‘कीर्तनसंध्या’मधून उलगडणार स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय योद्ध्यांची कहाणी रत्नागिरी : स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीय स्वातंत्र्य टिकविण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या आणि प्रसंगी बलिदान करणाऱ्या योद्ध्यांची कहाणी या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवात उलगडणार आहे. ‘योद्धा भारत’ हा या वेळच्या कीर्तनांचा आख्यानविषय आहे. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांच्या
रत्नागिरीतील कीर्तनसंध्या महोत्सव यंदा ‘योद्धा भारत’ या विषयावर रत्नागिरी : ‘योद्धा भारत’ म्हणजेच स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा हा या वर्षीच्या ‘कीर्तनसंध्या’ महोत्सवाचा विषय आहे. नवव्या वर्षात पदार्पण करतानाच दशकपूर्तीकडे वाटचाल करणारा कीर्तनसंध्या महोत्सव नव्या वर्षाच्या प्रारंभी, आठ ते १२ जानेवारी २०२० या काळात रंगणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language